यदु जोशी -मुंबई : राज्यातील १ कोटी ८३ लाख २३ हजार ६७६ म्हणजे तब्बल ४१.०६ टक्के महिलांनी लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदानच केले नाही. दोन्ही प्रमुख उमेदवार महिला असताना बारामती मतदारसंघातील ४३.६४ टक्के म्हणजे ४ लाख ९३ हजार ३८८ महिलांनी मतदान केले नाही. तेथे शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना आहे.
राज्यातील महिला मतदारांची संख्या होती ४ कोटी ४६ लाख २५ हजार ७४२. त्यापैकी २ कोटी ६३ लाख २ हजार ६६ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ५८.९४ टक्के महिलांनी मतदान केले आणि ४१.०६ टक्के महिला मतदानापासून दूरच राहिल्या.
दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी महिला असलेला बारामती हा एकमेव मतदारसंघ होता. मात्र, तेथील महिलांची मतदानाबाबत अनास्था दिसून आली. लोकसभेच्या ४८ मतदारसंघांपैकी २६ मतदारसंघांमध्ये ४० टक्के वा त्यापेक्षा अधिक महिलांनी मतदान केले नाही. मतदारसंघात एक प्रमुख प्रतिस्पर्धी महिला उमेदवार आहेत अशा ठिकाणीही अपवाद वगळता महिला मतदानासाठी इच्छुक नव्हत्या.
आदिवासी महिलांनी ठेवला आदर्श आदिवासी बहुल गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात महिला मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तिथे एकूण ८ लाख २ हजार ४३४ महिला मतदार होत्या. त्यातील ५ लाख ६७ हजार १५७ म्हणजे ७०.६८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. आदिवासी आरक्षित नंदुरबार मतदारसंघात ९ लाख ७७ हजार ३२९ महिलांपैकी ६ लाख ६९ हजार ५२८ म्हणजे ६८.५१ टक्के महिलांनी मतदान केले. सुशिक्षित महिलांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघांनी गडचिरोलीचा आदर्श घ्यावा अशी स्थिती आहे.
४० टक्के वा त्यापेक्षा अधिक महिलांनी मतदानच केले नाही असे मतदारसंघ -मतदारसंघ महिला मतदार टक्के कल्याण - ५,०३,७४० ५२.२५ मुंबई दक्षिण - ३,५१,६५७ ४९.९८ शिरूर - ६,०१,०८८ ४९.९८ ठाणे - ५,७०,३५४ ४९.२१ मुंबई उ.-मध्य - ३,९०,८३९ ४८.६९ पुणे - ४,८४,००४ ४८.२५ मावळ - ५,९५,०१० ४८.१५ नागपूर - ५,३१,१९६ ४७.८६ मुंबई द.-मध्य - ३,२२,९१७ ४७.०४ मुंबई उ.-पश्चिम - ३,६६,४०४ ४५.९९ मुंबई उ.-पूर्व - ३,४२,३९६ ४५.१२ जळगाव - ४,२७,६५७ ४४.७१ मुंबई उत्तर- ३,६९,७४७ ४३.८८ सोलापूर - ४,३१,९३५ ४३.७० बारामती - ४,९३,३८८ ४३.६४ धुळे - ४,१०,७१५ ४२.३४ नाशिक - ४,१०,२२७ ४२.२५ वर्धा - ३,४७,९४९ ४२.२१ रामटेक - ४,२०,५८६ ४१.८९ नांदेड - ३,७४,५५५ ४१.७७ अकोला - ३,७९,०३० ४१.५ शिर्डी - ३,३५,६५६ ४१.३ भिवंडी - ३,९४,६६६ ४१.२३ बुलडाणा - ३,४७,२७७ ४०.८८ सांगली - ३,७३,७५९ ४०.८५ परभणी - ४,१४,८८५ ४०.७१
मतदानाचा नीचांक कल्याणमध्ये कल्याण मतदारसंघात शिंदे सेनेचे डॉ.श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव सेनेच्या वैशाली दरेकर अशी लढत आहे. टक्केवारीचा विचार करता तिथे महिला मतदारांच्या मतदानाचा नीचांक नोंदविला गेला. एकूण ९ लाख ६४ हजार २१ महिला मतदारांपैकी ४ लाख ६० हजार २८१ महिलांनी मतदान केले. मात्र, तब्बल ५ लाख ३ हजार ७४० महिलांनी मतदान केले नाही. मतदान करणाऱ्यामहिलांची टक्केवारी ४७.७५ आहे तर मतदान न करणाऱ्या महिलांची टक्केवारी ५२.२५इतकी आहे. शिरुर मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉ.अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. मतदान न केलेल्या महिलांची राज्यातील सर्वात मोठी संख्या या मतदारसंघात आहे. तेथे ६ लाख १ हजार ८८ महिलांनी मतदानच केले नाही. मात्र, ही टक्केवारी ४९.९८ इतकी आहे. मावळमध्ये ५ लाख ९५ हजार १० महिलांनी मतदान केले नाही.
रायगडमध्ये पुरुषांपेक्षा महिलाच अव्वलरायगड हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले. तिथे मतदान केलेल्या महिला आहेत, ५ लाख ९ हजार २३० तर पुरुष मतदारांची संख्या आहे, ५ लाख ३३३. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ४ लाख ५९ हजार ९९ पुरुष तर ४ लाख ४८ हजार ५१८ महिलांनी मतदान केले.
या मतदारसंघांमध्येही महिलांचा लक्षणीय वाटा कोल्हापूर आणि हातकणंगले या पश्चिम महाराष्ट्रातील संपन्न मतदारसंघांमधील महिलांनी भरभरून मतदान केले. कोल्हापुरात ९ लाख ५१ हजार ५७८ महिला मतदार होत्या. त्यातील ६ लाख ६१ हजार ४५७ म्हणजे ६९.५१ टक्के महिलांनी मतदान केले. हातकणंगलेमध्ये ८ लाख ८८ हजार ३३१ महिला मतदारांपैकी ६ लाख ११ हजार ४५३ म्हणजे ६८.८३ टक्के महिलांनी मतदान केले. स्त्रीभ्रूण हत्येमुळे नामुष्की झालेल्या बीड मतदारसंघातील महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. तेथे ६८.२६ टक्के महिलांनी मतदान केले.