नंदुरबार - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून नागरीक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना पहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तरुणाने मतदान करणाऱ्यांना दाडी कटिंगमध्ये ५०% सूट देण्याचा उपक्रम राबवला आहे. नंदुरबार जिल्ह्यात या उपक्रमाची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.
मतदानाचा टक्का वाढवा म्हणून वेगवेगळ्या शक्कल लावण्याचा प्रयत्न, अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब चौका समोरील साई सलूनचे संचालक जितेंद्र भदाणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जनजागृती करण्यासाठी अनोखा प्रयोग केला. मतदान करून येणाऱ्या ग्राहकांना दाढी, कटिंग केल्यास ५०% सूट देण्याचा उपक्रम ते राबवत आहे.
भदाणे यांनी सात वाजता मतदान करून सलून सुरू केले. ज्या ग्राहकांनी मतदान केले असेल अशा ग्राहकांची दाडी कटिंग केली. ज्यांनी मतदान केले नाही अशा ग्राहकांना दाडी कटिंग न करता आधी मतदान करण्यास सांगितले. मतदान करून येणाऱ्या मतदाराला ५०% सूट दिले जाणार असल्याचे भदाणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मतदान करणाऱ्याला दाढी कटिंग केल्यास सूट मिळत असल्याने ग्राहकांनी आज सलूनवर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी हा प्रयोग केल्याचे भदाणे यांनी सांगितल.