सभेला गर्दी जालन्याची अन् सत्तारांना उमेदवारी हवी औरंगाबादची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:00 PM2019-03-30T12:00:41+5:302019-03-30T12:08:33+5:30
अब्दुल सत्तारांच्या सभेची गर्दी जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी या गर्दीचे रुपांतर मतदानात होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे गर्दीत असलेले सर्वाधिक लोक सिल्लोड येथील होते. वास्तविक पाहता सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभेत येतो.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये अजुनही गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. युतीचे उमेदवार जाहीर झाले असले तरी काँग्रेसमध्ये मात्र अजुनही संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून चंद्रपूर पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील राबवला जाईल, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी औरंगाबादेत शक्तीप्रदर्शन केले. आमखास मैदानावर सत्तार यांना गर्दी जमविण्यात यश आले. परंतु, ही गर्दी नेमकी कुठली, यावर आता चर्चा रंगत आहेत.
सत्तारांच्या सभेची गर्दी जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी या गर्दीचे रुपांतर मतदानात होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे गर्दीत असलेले सर्वाधिक लोक सिल्लोड येथील होते. वास्तविक पाहता सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभेत येतो. त्यामुळे सत्तारांचे शक्तीप्रदर्शन जालन्याऐवजी औरंगाबादमध्ये का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सत्तार यांच्या सभेला औरंगाबाद शहरातून हवा तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. कन्नड, सिल्लोड येथील कार्यकर्ते वगळता ग्रामीण भागातून लोकांचा प्रतिसाद हवा तसा दिसला नाही.
काँग्रेस की सत्तार कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील तिकीट वाटपामुळे नाराज असलेले अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्याचं ठरवले आहे. मात्र कार्यकर्त्यांचा कौल देखील आपल्यासाठी महत्त्वाचा असून मी काँग्रेसकडून लढवू की अपक्ष अशी विचारणा सत्तार यांनी सभेतून केली. सत्तारांचे बहुतेक कार्यकर्ते हे काँग्रेसमधील आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपला उमेदवार आधीच निश्चित केला आहे. त्यामुळे सत्तार की काँग्रेस असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.