मोसीन शेख
मुंबई - आर्दश गाव म्हणून प्रथम पुरस्कार मिळालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पाटोदा गावच्या या भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पाटोदा गावातील गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र गावातील गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गायरान जमीन प्रशासन देण्यास टाळत असल्याच्या आरोप पाटोदा येथील गावकऱ्यांनी केला आहे.
राज्यातच नव्हेतर देशभरात अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाटोदा पॅटर्न राबवला जातो. राज्यात आदर्श ठरलेल्या पाटोदा सारख्या गावाने मतदानावर बहिष्कार घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शासनाच्या तब्बल ५३ लाख रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले निर्मल ग्राम आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गाव राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे.
याविषयी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांना विचारले असता, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गावातील ३ एकर गायरान जमिनी मिळावी म्हणून आम्ही २०१४ पासून मागणी करत आहे. जमिनीच्या मोजणीसाठी आम्ही पैसे सुद्धा भरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा मोजणी करून ताबा देण्याची मागणी केली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्व गावकऱ्यांनी ठराव घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे पेरे यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना सांगितले.