मुंबई - स्वाभिमानी पक्षांचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या आत्मचरित्रातून होत असलेल्या वेगवेगळ्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण तापत असतानाच आता, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंबद्दल दोन मोठे खुलासे राणेंच्या आत्मचरित्रातून समोर आले आहे. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला सोबत येण्याची ऑफर दिली असल्याचा खुलासा नारायण राणेच्या आत्मचरित्रातून करण्यात आला आहे.
२००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करून एकत्रित काम करण्याचे निमंत्रण राज यांनी आपल्याला दिले होते. मात्र, मी त्यांना नकार दिला असल्याचा खुलासा नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून मधून करण्यात आला आहे. राज यांनी शिवसेना सोडण्यापूर्वीच राणे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र ' केले होते.
राज यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास आपल्याला प्रतिसाद कसा मिळेल, याचा अंदाज घेतला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते राज यांच्यासोबत गेले होते. असा दुसरा खुलासा सुद्धा राणेंच्या आत्मचरित्रातून करण्यात आला आहे.
शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून अजून काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.