मुंबई - देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पुन्हा पाहायला मिळाली. राज्यात युतीला यश मिळाले असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकात खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मराठा क्रांती मोर्चात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार हर्षवर्धन जाधव यांची मराठा समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच, लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयाला मराठा समाजाने त्यांना मोठा पाठींबा दिला.
ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झालेल्या औरंगाबादमध्ये मराठा मतदारांनी सत्तेत असलेल्या युतीच्या उमेदवाराला यावेळी घराचा रस्ता दाखवला. चंद्रकात खैरेंच्या विरोधात मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि लोकसभा लढणार असे जाहीर केले. त्यानुसार ते लढले. त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. जाधव यांना मराठा समाजाने भरभरून मते दिली. एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मते मिळाल्याचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाले.
चंद्रकात खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली तर विजयी उमेदवार ठरलेले इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आणि औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीचे 'गेमचेंजर' ठरलेले हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली आहे. प्रत्येक निवडणुकीत खैरे यांच्या हक्काचे असलेले मराठा मते यावेळी जाधव यांच्या पारड्यात पडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना मराठा समाजाचा मोठा पाठींबा मिळताना पहायला मिळाले. निवडणूक काळात मराठा समाजातील विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे जाधव यांचा प्रचार केला. तिकडे दलित- मुस्लीम मतदार मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग करण्यात जलील यांना यश मिळाले. त्यामुळे या दोन्हीचा फटका खैरे यांना बसला.
मराठा आरक्षणावरून सरकारकडून होणाऱ्या चालढकलपणामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष सरकारबद्दल होता. औरंगाबादमध्ये हा रोष प्रत्यक्षात निवडणुकीतून दिसून आला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. औरंगाबाद मधील मराठा मतदारांनी मात्र ते करून दाखवले.
लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे मते मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. मराठा क्रांती मोर्चानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार म्हणून जाधव निवडणुकीत असल्याने मतविभाजन अटळ होते. मतदारसंघात मराठा- पाटील समाजाच्या बैठकींचा जाधव यांनी धडका लावला होता. मराठा मतदारांनी जाधव यांना दिलेल्या पाठिंब्यामुळेच खैरंचा पराभव झाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.