भाजपाची 'कूssल' खेळी; बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:18 AM2019-03-23T10:18:40+5:302019-03-23T10:26:32+5:30
कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे लढत असलेल्या कांचन कुल यांच्या सुनेत्रा पवार या सख्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांनीच 2005 मध्ये राहुल आणि कांचन यांचे लग्न जमविले होते.
कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. याच घराण्यातील पदमसिंह पाटील हे दत्तक गेले आहेत. त्यामुळे नात्याने पाटील हेदेखील कांचन कुल यांचे चुलते आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत असलेले राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कुमारराजे हे वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच आणि सोमेशवर सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. कांचन कुल यांचे शिक्षण बारामतीतील शारदा नगर येथे झाले. त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली आहे. 2005 सली त्यांचा राहुल कुल यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या रंजना कुल यांचे चिरंजीव राहुल यांच्याशी विवाह जमविण्यात पवार यांनी पुढाकार घेतला होता. राहुल यांचे वडील सुभाष कुल 1990 ते 2001 या काळात दौंडचे आमदार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर पत्नी रंजना कुल पोटनिवडणुकीत निवडून आल्या. 2004 च्या निवडणुकीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर पुन्हा आमदारकी मिळवली होती. 2009 साली राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. मात्र त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी राहुल यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत राहुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून आमदारकीची निवडणूक लढविली. यामध्ये त्यांचा विजय झाला.
बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी https://t.co/aiCjljkiVq
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 22, 2019
दौंड तालुक्यातील राजकारण हे राहुल आणि रमेश थोरात यांच्याभोवती केंद्रित आहे सुभाष कुल यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल यांच्या पालकत्वाची भूमिका स्वीकारली होती. राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना कारखान्याला मदत करण्याचा विषय असो किंवा कुल थोरात गटात उमेदवारि देण्याचा निर्णय, पवार यांनी कुल यांची बाजू घेतली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तसक्षम उमेदवाराचा शोध भाजपा कडून सुरू होता. सुरुवातीला माजी आमदार रंजना कुल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून कांचन कुल यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह होता. कांचन यांना नऊ वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. मुलगी लहान असल्याने सुरुवातीला त्या निवडणुकीसाठी तयार नव्हत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता सुप्रिया सुळे आणि कांचन कुल या बारामतीच्या लेकींची लढाई होणार आहे.
ठरलं! पुण्यातून गिरीश बापट, तर सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी, भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध https://t.co/qNBIC591Q0
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 22, 2019