मुंबई - भारतीय जनता पक्षाने पुण्याची लोकसभेची उमेदवारी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. २०१४ मध्ये लोकसभेसाठी उत्सुक असलेले बापट यांची इच्छा पक्षाने यावेळी पूर्ण केली. यासाठी राज्यातील नेत्यांनी देखील हातभार लावल्याचे समजते. भाजपने शिरोळे यांचे तिकीट कापून बापट यांना उमेदवारी देत एकप्रकारे पुण्यातील पक्षाचा नियम पाळला आहे.
पुण्यात भाजपकडून कोणत्याही उमेदवाराला आतापर्यंत दोनदाच उमेदवारी देण्यात आली आहे. हा नियम विद्यमान खासदार शिरोळे यांना देखील लागू झाला आहे. याआधी अण्णा जोशी यांना पक्षाने दोनदाच उमेदवारी दिली होते. त्यांनी १९८९ आणि १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. ते १९९१ मध्ये निवडून आले होते. त्यानंतर प्रदीप रावत यांना देखील भाजपने १९९९ आणि २००४ मध्ये उमेदवारी दिली होती. प्रदीप रावत १९९९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. तर शिरोळे यांना २००९ आणि २०१४ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी २००९ मध्ये शिरोळे यांचा पराभव झाला होता. तर २०१४ मध्ये शिरोळे विजयी झाले होते.
दरम्यान गिरीश बापट यांना देखील पुण्याची उमेदवारी दुसऱ्यांदा मिळाली आहे. बापट यांनी याआधी १९९६ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्याकडून बापट यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बापट यांना दुसऱ्यांदा पुणेलोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. बापट हे १९९५ पासून कसबा मतदार संघाचे आमदार आहेत.