मुंबई: निवडणुकीची रणनीती आखण्यात माहीर असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 'मिशन 2019'साठी महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी लाट उसळली होती. भाजपा-शिवसेना युतीनं 48 पैकी 42 जागा जिंकण्याची किमया केली होती. भाजपाच्या 24 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण, राज्यातील आजचं राजकीय चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेना सत्तेत भाजपासोबत असली, तरी या दोघांमधील नातं, 'दोस्त दोस्त ना रहा' अशा स्वरूपाचं झालंय. शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिलाय. त्यात, 'मोठा भाऊ' म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला इंगा दाखवणं हाच उद्देश दिसतोय. दुसरीकडे, पोटनिवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर, विरोधकांच्या ऐक्यानंतर भाजपाला मित्रांची आठवण झालीय. पण त्यांच्यावर 'मातोश्री' प्रसन्न होणार का, याबद्दल शंकाच आहे.
गेल्या महिन्यांत अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेना स्वबळाची भाषा बोलतेय. त्यामुळे आता भाजपाने आपला प्लॅन-बी राबवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी एकीकडे सुरू ठेवलेत. अमित शहांनी पुण्यात जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतलेली भेट, हा त्याचाच भाग मानला जातोय. पण या प्रयत्नांना यश न आल्यास, शिवसेनेनं 'टाळी' न दिल्यास, स्वबळावर 32 जागा जिंकण्यासाठी भाजपा रणनीती आखणार असल्याचं पक्षातील विश्वसनीय सूत्राने सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनमानसांतील प्रतिमा, सरकारचं काम आणि ग्रामीण भागात वाढलेली पक्षाची ताकद या जोरावर गेल्यावेळच्या 24 जागांवरून 32 जागांपर्यंत मजल मारणं शक्य असल्याचं गणित भाजपाने मांडलंय. त्यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्याने, स्वयंसेवकांची मोठी फळी प्रचारात उतरू शकेल, असंही नियोजन केलं जातंय.
अर्थात, हे समीकरण कागदावर सोपं वाटत असलं, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास मतविभाजनाचं गणितच निर्णायक ठरणार आहे आणि ते भाजपासाठी धोक्याचंच असेल. आता त्यातून भाजपाचे चाणक्य कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.