मुंबई - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून भारतावर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. या अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले होता. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देताना पाकिस्तानातील अतिरेकी स्थळांवर हल्ले चढवले. त्यात अनेक अतिरेकांना ठार करण्यास यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
याच मुद्दावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार राजकारण करण्यात येत आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सैन्याच्या शौर्याचे श्रेय घेताना दिसत आहे. वास्तविक पाहता प्रचार सभांमध्ये सैन्याच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र भाजपकडून सैन्य कारवाईचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. असं असले तरी स्थानिक पातळीवर या मुद्यांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सैनिक आणि अतिरेकी यांतील फरकच समजेना झाला. त्यामुळे अनेकदा आमच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानचे जवान शहिद केल्याचे वक्तव्य नेतेमंडळी करताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणांमध्ये पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारल्याचे म्हटले होते. त्यावेळी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर आणि भाजप नेेते विजय औताडे यांनी देखील पाकिस्तानच्या अतिरेक्यांना भारताच्या सैनिकांनी शहिद केल्याचे म्हटले. याचा व्हिडिओ रावसाहेब दानवे यांच्या पेजवर उपलब्ध आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याचे शौर्य देशभारतील प्रचार सभांमध्ये सांगत आहे. त्याचवेळी राज्यपातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्याचा कित्ता गिरवण्यात येत आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक नेत्यांना सैन्यांची कारवाई आणि त्यांनी केलेले शौर्य सांगणे जिकीरीचे ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सैनिक शहिद होत असतात आणि शत्रुला ठार मारले जाते, यातलाच फरकच अनेकदा भाजप नेत्यांना समजत नसल्याची वस्तुस्थिती आहे.