कोल्हापूर : सेना-भाजप युतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ अंबाबाईच्या दर्शनाने झाला. अंबाबाईचा लौकिक मोठा आहे, आतापर्यंत तिच्याच चरणी प्रचाराचे नारळ फुटले आहेत, आताही तिच्याच आशीर्वादाने पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास व्यक्त करत अंबाबाईची ओटी भरून विजयाचे साकडे घातले.रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंदिरात दाखल झाले. त्यांच्यासमवेत युवासेनेचे आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय पाटील, खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री दिलीप केसरकर, आदेश बांदेकर, हातकणंगले सेनेचे उमेदवार धैर्यशील माने होते. या सर्वांनी १0 मिनिटे एकत्रितपणे दर्शन घेतले.
आत सोडण्यावरून गोंधळमुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ व नेतेमंडळी येणार असल्यामुुळे पोलिसांनी सुरक्षा कडक केली होती. या कडक व्यवस्थेचा फटका खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही बसला. सर्व मंत्री आत गेल्यानंतर महाजन व खासदार संजय पाटील आले, त्याचवेळी प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालत रेटारेटी करत होते. यातूनच वाट काढत पाटील आत गेले, तोपर्यंत पोलिसांनी गेट बंद केले, महाजन बाहेरच राहिले.
पाटील यांनी त्यांना आत येण्यास सांगितले; पण महाजन यांनी गर्दी आहे, तर कशाला आत जायचे म्हणतच आत प्रवेश केला. साध्या वेषात असणाऱ्या महाजनांना पोलिसांनीही ओळखले नाही. दरम्यान मंत्री येण्याआधी अर्ध्या तासापासून दर्शनही बंद करण्यात आले. पोलिसांनी प्रसारमाध्यमाचे व छायाचित्रकारांनाही आत जाण्यास मज्जाव केला.श्रीपूजकांकडून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचा धनादेशसर्वांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांचे देवस्थान समितीतर्फे स्वागत करण्यात आले. श्रीपूजकांनी एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हातात दिला. सोबत बंद लखोट्यातून एक पत्रही दिले. याची चर्चा मंदिर परिसरात सुरूहोती.
१९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार पहिल्यांदा आले. त्याच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून अंबाबाईच्या दर्शनाने झाला होता. यापूर्वी गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनीही प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वी अंबाबाईला साकडे घातले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत सेना भाजपच्या नेत्यांनी रविवारी सायंकाळी अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा प्रारंभ केला.