उर्मिलाच्या उमेदवारीने मुंबई उत्तरमध्ये रंगणार 'मराठी Vs अमराठी' लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:44 PM2019-03-29T12:44:06+5:302019-03-29T12:45:54+5:30
मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठीकाँग्रेसकडून सिनेतारका उर्मिला मातोंडकर हिला मुंबई उत्तर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचे उर्मिलासमोर खडतर आव्हान आहे. परंतु, मुंबई उत्तर मधील ही लढत मराठीविरुद्ध अमराठी अशीच रंगणार असल्याचे चित्र आहे.
मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. हाच धागा पकडून काँग्रेसच्या वतीने उर्मिला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. उर्मिला मराठी असून त्यांना मराठी भाषेची चांगली जाण आहे. तसेच मराठीतून संभाषण करण्यासाठी त्यांना अडचण येणार नाही. काँग्रेससाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. मुंबई उत्तर मतदार संघात काँग्रेसचा डोळा २८ टक्के मराठी मतदारांवर आहे. उर्मिलाच्या मदतीने मराठी मतदार आपल्याकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याला यश आल्यास काँग्रेससाठी मुंबई उत्तरमधील निवडणूक काही प्रमाणात सुकर होणार आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र २००४ मध्ये अभिनेता गोविंदाने याच मतदार संघातून राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर नाईक यांचा २००९ मध्ये संजय निरुपम यांच्याकडून पराभव झाला होता. त्यावेळी मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. परंतु, २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ गोपाळ शेट्टी यांनी भाजपला मिळवून दिला आहे. आता या मतदार संघातील मतदार पुन्हा एकदा शेट्टींना निवडणार की, मराठमोळ्या उर्मिलाला संधी देणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.