मुंबई - राज्यातील चंद्रपूर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. अखेरीस काँग्रेसने चंद्रपूरमधील पेच दूर करत विनायक बांगड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला चंद्रपूर मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. परंतु, मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१९५२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजयी झाले होते. त्यांच्यानंतर १९५७ मध्ये व्ही.एन. स्वामी निवडून आले. परंतु, १९६२ मध्ये लाल शाम शाह यांनी अपक्ष विजय मिळवला. शाह यांच्या राजीनाम्यानंतर १९६४ मध्ये येथे झालेल्या फेर निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या जी.एम. कन्नमवार यांनी विजय मिळवला. तर १९६७ मध्ये के.एम. कौशिक अपक्ष निवडून आले. त्यानंतर १९७१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अब्दुल शफी निवडून आले. परंतु काँग्रेसच्या विजयाची परंपरा भारतीय लोकदलचे राजे विश्वेश्वर राव यांनी खंडित केली. त्यानंतर काँग्रेसकडून शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूरमधून १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसचा गड मानला जात होता.
दरम्यान १९९६ मध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसचा गड असलेला चंद्रपूर मतदार संघ हिसकावला. मात्र १९९८ आणि १९९९ मध्ये काँग्रेसने येथे पुन्हा कमबॅक केले. काँग्रेसच्या नरेश पुगलीया यांनी दोन्ही वेळा विजय मिळवला. परंतु, २००४ मध्ये भाजपने हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. अहिर यांनी त्यावेळी विजय मिळवला. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये देखील हा मतदार संघ भाजपला मिळवून दिला. त्याचे फळ त्यांना २०१४ मध्ये मिळाले असून मोदी सरकारमध्ये हंसराज अहिर यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी संधी देण्यात आली होती.
शिवसेना आमदार धानोरकर होते इच्छूक
चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता आमदार धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. आता चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांना विनायक बांगड यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीतच चंद्रपूर गड कुणाचा हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.