लोकसभा निकालानंतर आज कॉंग्रेस- राष्ट्रवादीची संयुक्त बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:50 AM2019-05-28T11:50:14+5:302019-05-28T11:50:42+5:30
या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वच ठिकाणी धूळ चारली. महाराष्ट्रात ही काही वेगळा निकाल आला नसून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला ४८ जागांपैकी फक्त ६ जागांवर विजय मिळवता आले आहे. या पराभवानंतर आज पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिलीच संयुक्त बैठक पार पडणार आहे. मुंबईत आज ही आढावा बैठक होणार असे सांगण्यात येत आहे.
या बैठकीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह, शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई (कवाडे गट) यांचे नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एवढ्या मोठ्याप्रमाणात पराभव का झाला, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. भाजप विरोधात वातावरण असताना सुद्धा महाआघाडीला अपयश येण्याचे कारणे कोणती आहेत, यावर चर्चा होणार आहे. विधानसभेच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला आहे त्यावर देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते.
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी अवघ्या ५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ ठिकाणी काँग्रेसला समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्या, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय बदल करायला पाहिजे याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.