मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने रात्री उशीरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना आणि लातूर मतदार संघाचे उमेदवार काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना मतदार संघातील उमेदवारीचा तिढा अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता. सुभाष झांबड हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे असून त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे. विलास औताडे हे २०१४ मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना आव्हान देणार आहे.
दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अर्जुन खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले होते. परंतु, खोतकर यांचे बंड शांत करण्यात शिवसेना आणि भाजपला यश आले. त्यानंतर खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या आशा मावळल्या होत्या. अखेरीस काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये विलास औताडे यांना जालन्याची उमेदवारी दिली आहे. तर लातूरमधून मच्छींद्र कामत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.