औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक पक्षांना उमेदावारी जाहीर केली आहे. परंतु, तिढा निर्माण झालेल्या जागांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामध्ये मराठवाड्यातील काही मतदार संघांचा समावेश आहे. हिंगोली मतदार संघासह आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा तिढा समोर आला आहे. राष्ट्रवादीला औरंगाबाद मतदारसंघ हवा असून काँग्रेसलाउस्मानाबाद मतदार संघ हवाय. याआधी हिंगोली मतदार संघासाठी शिवसेना-भाजप यांच्यात तिढा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. परंतु काही जागा लढवण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद मतदार संघांचा समावेश आहे. लातूर मतदार संघ राखीव असल्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदार संघाची मागणी केली आहे. लातूर आणि सोलापूर मतदार संघातील लिंगायत समाजाचा वाढता प्रभाव पाहता चाकूरकर यांना उस्मानाबादेतून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यास काँग्रेस इच्छूक आहे. त्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीला देखील औरंगाबाद मतदार संघ हवा आहे. त्यामुळे औरंगाबादच्या मोबदल्यात राष्ट्रवादी उस्मानाबाद मतदार संघ काँग्रेसला देईल का, असा प्रश्न आहे. सध्या तरी उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्या पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत. त्याचवेळी त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. परंतु, उस्मानाबाद मतदार संघ काँग्रेसला दिल्यास पद्मसिंह पाटील यावर काय भूमिका हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.