Lok Sabha Election : 'डॅमेज कंट्रोल'साठी विखे-पाटील दिलीप गांधींकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:55 AM2019-03-28T10:55:26+5:302019-03-28T10:56:49+5:30
दिलीप गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. केवळ पुत्रप्रेमापोटी विखे-पाटलांनी गांधी यांची समजूत काढण्यासाठीच भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामील असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले नगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुरेंद्र गांधी यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. गांधी यांची नाराजी दूर करून डॅमेज कंट्रोलसाठी विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. केवळ पुत्रप्रेमापोटी विखे-पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
नगरमधून राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती. परंतु, हा मतदार संघ देण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी देखील मिळाली आहे. परंतु, विद्यमान खासदार दिलीप गांधी उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात केल्यामुळे नाराज आहे. तसेच दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुरेंद्र यांनी बंडखोरीचे निशान फडकवत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे नुकसान होण्याची शक्यता असून सुजय यांच्या विजयात अडचण येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधी यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते. मात्र तसं झालं नसून भाजपच्या डॅमेज कंट्रोलसाठी विखे यांची पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.