बीड - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मैदानात उतरले आहे. त्यांनी जिल्ह्यात जागोजागी सभांचा धडका लावला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिण पंकजा मुंडे यांच्यावर दारुच्या कारखान्यावरून टीका केली. माजलगाव येथील बैठकीत ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारसह आपल्या बहिणी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्यावर घणाघातील टीका करताना म्हटले की निवडणुका आल्या की, बाबा म्हणून जनतेला भावनिक साद घालायची आणि मते मागण्याचं काम करायचे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता यांचीच. आमदारकी यांच्याकडे, मंत्रीपद, जिल्हा परिषद, बँका, साखर कारखाना यांच्याकडेच, दारुची फॅक्ट्री यांचीच असा टोला लगावताना बीड जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
तसेच बीड जिल्ह्याला उसतोड मुजरांचा जिल्हा असा असलेला कलंक आमच्या बहिणींना मिटवता आला नाही. जिल्ह्याचा हा कलंक पुसण्याचे स्वप्न दिवंगत मुंडे साहेबांचे होते, परंतु वडिलांचे राजकीय स्वप्नच आमच्या बहिणींना जमले नाही, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.