नंदुरबार: लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि या काळात पोलिसांकडून, निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया काही नवीन नाहीत. मात्र नंदुरबारमध्ये काल पोलिसांनी केलेली एक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. काल नंदुरबारमध्ये मतदान झालं. त्यावेळी पोलिसांनी एका कुत्र्याला ताब्यात घेतलं. कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे स्टिकर्स असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकालादेखील ताब्यात घेतलं.काल नंदुरबारमधल्या नवनाथनगरमध्ये एकनाथ मोतीराम चौधरी (वय 65) त्यांच्या कुत्र्यासोबत अंधारे रुग्णालय परिसरात फिरत होते. त्यांच्या कुत्र्याच्या शरीरावर भाजपाचे स्टिकर्स आणि पक्षाचं कमळ चिन्ह स्पष्टपणे दिसत होतं. 'मोदी लाओ, देश बचाओ' असं घोषवाक्य कुत्र्याच्या शरीरावर असलेल्या स्टिकरवर होतं, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यात मतदान सुरू असताना कुत्र्याच्या माध्यमातून भाजपाचा प्रचार सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली. त्यानंतर शहरात फिरत असलेल्या चौधरी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मतदान सुरू असतानाही प्रचार केल्याप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी महापालिकेला कुत्र्याचा ताबा घेण्यास सांगितलं.
भाजपाचा प्रचार केल्याप्रकरणी कुत्र्याला घेतलं ताब्यात; पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:12 AM