मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. परंतु, अहमदनगर मतदार संघात एका दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दाम्पत्य दुसरं, तिसरं कोण नसून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांची पत्नी आहे. काही कारणास्तव उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास आपल्या कुटुंबातील उमेदवारी अर्ज कायम रहावा यासाठी डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे.
माजी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विषेश म्हणजे सुजय विखे पाटील यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांनी चार अर्ज का दाखल केले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, सुजय यांच्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या पत्नीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.
काही कारणास्तव आपला उमेदवारी अर्ज बाद झाल्यास, उमेदवारी रद्द होईल. या भीतीने सुजय विखे यांनी पत्नीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता डॉ. सुजय विखे यांनीच चार अर्ज दाखल केले आहे.
उमेदवारी अर्जात चुक निघाल्यास उमेदवारी रद्द होण्याची शक्यता असते. अशा वेळेस अर्ज रद्द झाला तरी कुटुंबातील एक व्यक्ती लोकसभेच्या रिंगणात राहिल या उद्देशाने आणि उमेदवारी अर्ज चुकण्याच्या भितीने विखे कुटुंबाकडून तब्बल पाच अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान नगरच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतदार संघ बदलीवरून चर्चा झाली. मात्र नगर सोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार नसल्यामुळे सुजय विखे यांनी अखेरीस भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपकडून नगरची उमेदवारी मिळाली.