Lok Sabha Election 2019 : सप-बसपमुळे वचिंत आघाडीला घोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:09 PM2019-03-19T12:09:27+5:302019-03-19T12:10:54+5:30
काँग्रेस आघाडीकडून एकही जागा मिळत नसल्याचे पाहून सप-बसपने महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांच्या आघाड्या झाल्या, तर अनेक पक्षांची आघाडीची बोलणी रेंगाळली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला बाजुला ठेवत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्याचाच कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याची तयारी सप-बसपने केली आहे. परंतु, यामुळे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचा घोर वाढणार आहे.
उत्तर प्रदेशातील आघाडीची बोलणी संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसने आणि सप-बसप यांनी उमेदवार घोषित केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील या दोन्ही पक्षांनी काँग्रेस आघाडीशी अंतर ठेवले आहे. तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागांवर उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेस आघाडीकडून एकही जागा मिळत नसल्याचे पाहून सप-बसपने हा निर्णय घेतला आहे. याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाचा डोळा मुस्लीम मतदारांवर असून बसपची मदार दलित मतदारांवर आहे. याचा सरळ फटका प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांच्या वचिंत आघाडीला बसणार आहे. सप-बसपमुळे वंचित आघाडीच्या मुस्लीम आणि दलित मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान याचा संपूर्ण लाभ भाजपला होणार आहे, हे निश्चितच आहे.
दुसरीकडे याआधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी देखील वंचित आघाडीचा लाभ भाजप-शिवसेनेला होईल असं म्हटले होते. त्यामुळे वंचित आघाडी आणि सप-बसप यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस नेतृत्व काही हालचाली करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.