मुंबई - काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' या मोहिमेला छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मै भी चौकीदार’ ही टॅग लाईन घेऊन २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला. त्याच्या एक पाउल पुढे जात आता महाआघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 'लाज कशी वाटत नाही ?, ही मोहिम सुरू केली आहे. आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
पाच वर्षांत जनतेची केलेली फसवणूक, शेतकरी कर्जमाफीचे गाजर, उज्ज्वला योजनेचे अपयश, वाढलेली बेरोजगारी याचा जाब काँग्रेस-राष्ट्रवादी ‘लाज कशी वाटत नाही’ या मोहिमेतून भाजप-शिवसेनेला विचारत आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी संयुक्तपणे प्रचार करताना दिसत आहे. तर युतीमध्ये भाजप एकटेच विरोधकांना उत्तर देताना दिसत आहे.
एवढे दिवस केवळ सोशल मीडियावर राबविण्यात येत असलेली ही मोहिम राज्यभरातील विविध शहरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून बॅनरच्या माध्यमातून शिवसेना-भाजपवर टीका करण्यात येत आहे. अकोला येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर आघाडीकडून महिलांविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.
मुली पळविण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच, असंही बॅनरवर म्हटले आहे. गेल्या वर्षी दहिहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करत मुलींना पळवून आणू असं म्हटले होते. त्याचा समाचार या बॅनरमध्ये घेण्यात आला आहे. असे अनेक मुद्दे घेऊन आघाडीची मोहिम सुरू आहे.