मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नववी यादी रविवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये अनेक आश्चर्यकारक बदल करण्यात आले आहेत. हिंगोली मतदार संघातून पूर्वीचे शिवसेनेचे आणि आता भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी वानखेडे उमेदवारी देण्यात आली आहे.
सातव यांनी आपल्याकडे गुजरात लोकसभेची जबाबदारी सोपविल्यामुळे माघार घेतल्याचे म्हटले आहे. याआधी गुजरात विधानसभा निवडणुकीत सातव यांनी गुजरातमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपविली आहे. पक्ष नेतृत्वाने सांगितल्यामुळेच आपण गुजरातमध्ये काँग्रेस प्रभारी म्हणून काम करणार असल्याचे सातव म्हणाले. सातव यांनीच २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेकडून लढत असलेल्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता.
सुभाष वानखेडे यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना हिंगोलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. विद्यमान खासदार सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपविल्यामुळे हिंगोलीचा उमेदवार निवडण्याची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार सर्वांशी चर्चा करून वानखेडे यांची निवड केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाजप नेतृत्वाला हिंगोलीतून आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये सातव काँग्रेसला अधिकाअधिक जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच भाजप नेतृत्वाला अधिकाअधिक गुजरातमध्ये अडकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना करण्यासाठी सातव यांची पक्षाला मदत होणार आहे. अमित शाह गांधीनगर येथून निवडणून लढविणार आहेत. त्यामुळे हिंगोलीतून एकप्रकारे भाजपला अप्रत्यक्ष आव्हान मिळणार आहे.