धुळे - लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे. भाजप पक्षाविरुद्ध बंडखोरी करणारे आणि धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. बुधवारी हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. तेही, राजीनामे बागडे यांनी स्वीकारले आहे.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी भाजप पक्षाच्या विरोधात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटे यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले होते. लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत भाजप विरोधात रिंगणात उतरले होते. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गोटेंनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गोटेंचा राजीनामा बुधवारी स्वीकारला आहे. भाजपनेदेखील याधीच त्यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली होती.
अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे.
अनिल गोटे यांनी लोकसभा लढवत असल्याने राजीनामा दिला होता. कन्नड विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश बाळू धानोरकर यांनी भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे कारण देत राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सादर केला होता. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने चिखलीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.