मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध मोहिम उघडली आहे. राज यांनी जाहीर सभांमधून भाजपच्या धोरणांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सध्या भाजपच्या आयटी सेलच्या निशान्यावर आहेत. त्यानंतर सोशल मीडियातून कोणीही माझ्यावर पातळी सोडून टीका केल्यास त्याला धडा शिकविण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना राज यांनी दिले आहेत. त्यातच पातळी सोडून टीका करणाऱ्यांला त्याच्या घरी जावून चोप देतानाचा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनसेचे कार्यकर्ते एका घरासमोर उभा राहून राज ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्याला माफी मागायला भाग पाडत आहेत. तसेच यापुढे राज यांच्याविरुद्ध खालच्या भाषेत टीका न करण्याची कबूली घेत आहेत.
याआधीच राज यांनी एका सभेत आपण 'ट्रोलर्स'ला भीक घातल नसल्याचे म्हटले होते. तसेच भाजपचे आयटी सेलेचे कार्यकर्ते आणि भक्त लावारीस असल्याची कडाडून टीका करताना पातळी सोडून टीका करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून टीका करणाऱ्यांना धडा शिकविण्याच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्याला समज देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी सावध टीका करावी, पातळी सोडून टीका केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल, असं औरंगाबादमधील मनसेचे पदाधिकारी संदीप कुलकर्णी यांनी म्हटले आहे.