- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला फाटा दिल्याचे दिसून आले.
देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. या दोन राज्यांत भाजप नेत्यांनी ज्याप्रमाणे विजय मिळवला, त्यावर जाणकारांच्या मते जनता आता जातीच्या राजकारणातून बाहेर आल्याचे दिसून येते.
उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६३ आणि बिहारमधील ४० पैकी ३७ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजयाची नोंद केली आहे. भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने राष्ट्रवादाच्या आणि काही प्रमाणात विकासाच्या मुद्दावर या निवडणुकीला सामोरे गेला. यासह भाजपने नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर ठेवला. त्यामुळे भाजपला ऐतिहासिक विजयाची नोंद करता आली.
वास्तविक पाहता, उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षांनी जातीच समीकरणे बसवून युती केली. यामध्ये मुस्लीम, यादव आणि दलित मतांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी खास प्रयत्न केले. परंतु, बालाकोटनंतर करण्यात आलेले एअरस्ट्राईक आणि भाजपने पाकिस्तानविरुद्ध घेतलेला आक्रमक पावित्रा जातीपातीच्या राजकारणाला फाटा देणारा ठरला.
दरम्यान २००४ प्रमाणे निकाल उलट लागतील अशी आशा विरोधकांना होती. परंतु त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे नियोजन आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेले विश्वास यामुळे विरोधकांच्या आशा सत्यात येऊ शकल्या नाही.
महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाचा फायदाच
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पक्षाने गेल्या वेळपेक्षा मोठे यश मिळावले. राज्यात युती तब्बल ४१ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांनी युती करत वंचित बहुजन आघाडी तयार केली होती. तसेच सर्वच्या सर्व ४८ जागा लढवल्या. मात्र वंचितचे उमेदवार औरंगाबाद वगळता, भाजपसाठी फायदेशीरच ठरल्या विरोधकांचे म्हणणे आहे. कारण काँग्रेसला मिळणारी दलित आणि मुस्लीम मते बहुतांशी प्रमाणात वंचितकडे फिरली. याचा लाभ भाजपलाच झाला. औरंगाबादमधून वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील विजय झाले.
प्रादेशिक अस्मिताही फिकी
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी केली आहे. डाव्यांचा पाडाव केल्यानंतर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळाले. यासाठी येथील प्रादेशिक अस्मिता देखील महत्त्वाची होती. मात्र बंगालमधील जनतेने हा मुद्दा बाजुला सारून भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. त्यामुळे जाती-पातीच्या राजकरणासह प्रदेशिक अस्मितेवर देखील राष्ट्रवादाचा मुद्दा भारी पडला आहे.