नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी खुद्द मोदी मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:03 PM2019-04-06T13:03:22+5:302019-04-06T13:04:05+5:30

काँग्रेसने आतापर्यंत तब्बल १५ वेळा नांदेडमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसचा हा गड पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये आज सभा घेत आहेत.

Lok Sabha Election 2019 Modi's rally in Nanded to stop Ashok Chavan | नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी खुद्द मोदी मैदानात

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी खुद्द मोदी मैदानात

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आणि पक्ष नेतृत्व विविध मतदार संघ पिंजून काढताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण जोर लावत आहे. राज्यातील महत्त्वाच्या लढतींवर नजर टाकल्यास नांदेड येथील लढतीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात काँग्रेसने आतापर्यंत तब्बल १५ वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसचा हा गड पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये आज सभा घेत आहेत.

नांदेड मतदार संघातून काँग्रेसने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर एनडीएकडून शिवसेनेचे बंडखोर नेते प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांना हा मतदार संघ आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते शंकरराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून दोन नेते मराठवाड्यातून उदयास आले. एक म्हणजे, त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण तर दुसरे होते, विलासराव देशमुख. मराठवाड्यातील या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान मिळवलेला आहे.

नांदेड मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. आकडेवारी पाहिल्यास या मतदार संघात १९ वेळा लोकसभा निवडणूक झाली. यापैकी १५ वेळा काँग्रेसने विजयाची नोंद केली आहे. १९५७ ते १९७१ पर्यंत येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. १९७७ मध्ये जनता पक्षाने येथे विजय मिळवला. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा काँग्रेसचे पुनरागमन झाले. त्यानंतर १९९९ पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसकडे होता. १९८० आणि १९८४ मध्ये येथून शंकरराव चव्हाण विजयी झाले होते. तर १९८७ च्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण विजयी झाले होते.

दरम्यान १९८९ मध्ये जनता दलाने येथे विजय मिळवला. त्यानंतर हा मतदार संघ पुन्हा एकदा काँग्रेसने घेतला. परंतु, २००४ मध्ये येथे कमळ फुलले. त्यावेळी डी.बी. पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसने हा मतदार संघ पुन्हा मिळवला. तेव्हापासून हा मतदार संघ काँग्रेसकडे असून अशोक चव्हाण खासदार आहेत.

काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

नांदेड लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. दलित आणि मराठी मतदार येथे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मुस्लीम मतदार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तब्बल १५ वेळा या मतदार संघात विजय मिळवणाऱ्या काँग्रेससाठी हा गड राखण्याचे आव्हान आहे. परंतु, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे नांदेडकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

२०१४ मधील स्थिती

विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी २०१४ मध्ये डी.बी. पाटील यांना ८१ हजार ४५५ मतांनी पराभूत केले होते. अशोक चव्हाण यांना ४,९३,०७५ मते मिळाली होती. तर पाटील यांना ४,११,६२० मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर बीएमयुपी तिसऱ्या स्थानी होता.

Web Title: Lok Sabha Election 2019 Modi's rally in Nanded to stop Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.