मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात समेट घडवून आणली होती. त्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात होते. परंतु, शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्यातील जवळीक उदयनराजे यांच्या अडचणीत भर घालणारी असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगत आहे.
शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नरेंद्र पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. यावेळी पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या नावाने घोषणा देखील दिल्या. त्यामुळे शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांची दोस्ती पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. उदयनराजेंसाठी ही बाब चिंता वाढवणारी आहे.
याआधी देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांची भेट घेतली होती. दोघांनी एका हॉटेलमध्ये सोबत मिसळ खाल्ली होती. त्यावेळी देखील शिवेंद्रराजेविरुद्ध उदयनराजे भोसले अशा चर्चा होत्या. दरम्यान, शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणले होते. त्या मनोमिलनाच्या वेळीच 'मै जो बोलता हुं वो में करता हूं, और जो में नही बोलता, वो में डेफिनेटली करता हूं, असा डायलॉग शिवेंद्रराजे यांनी मारला होता. तो डायलॉग उदयनराजे यांना उद्देशून तर नव्हता असा प्रश्न सातारकरांना पडला आहे.