पुणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. या टप्प्यात अनेक प्रतिष्ठेच्या लढती असून पश्चिम महाराष्ट्रातील मावळ आणि शिरूर मतदार संघांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक खुलासा केला करून प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एक घाव दोन तुकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
पुण्यात आयोजित सभेत डॉ. कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रासाठी भावनिक मुद्दा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज छत्रपती उदयनराजे यांना आव्हान द्याचे नव्हते म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे म्हटले. छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी राजे साकारणारे अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनाला 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिवसेनेत असताना आपल्याला साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु, छत्रपतींच्या गादीसोबत आपण गद्दारी करू शकत नव्हतो, त्यामुळे शिवसेना सोडून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणे पसंत केल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या खुलाशामुळे शिवसेना नेतृत्वाचे धोरण आणि सातारा जिंकण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. तसेच कोल्हे यांनी खुलासा करून शिवसेना नेतृत्वालाच टोला लगावला आहे.
मतदानासाठी एक दिवस शिल्लक असताना कोल्हे यांनी केलेला खुलासा राष्ट्रवादीसाठी किती फायद्याचा ठरणार हे येणारा काळच सांगणार आहे. दरम्यान शिवसेनेकडून साताऱ्यातून उदयनराजे यांच्याविरुद्ध माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. साताऱ्यातील मतदान याआधीच झाले आहे.