मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रमाणे विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. त्याचप्रमाणे यंदा सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादीने देखील ४० प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना सामील करण्यात आलेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे यांचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील उदयनराजे यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. असं असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. वस्तविक पाहता छत्रपती उदयनराजे यांची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोविंग पाहता, ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी भाजपविरुद्ध 'ब्रह्मास्त्र' ठरू शकतात.
साताऱ्यातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणारे उदयनराजे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. त्यामुळे प्रचारासाठी त्यांचा राष्ट्रवादीला मोठा लाभ होऊ शकतो. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांकडे प्रचंड फॉलोवर्स असलेल्या स्टार प्रचारकांची कमतरता आहे. त्या तुलनेत भाजपकडे राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत स्टार प्रचारकांची फौज आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे छत्रपती उदयनराजे यांच्या प्रसिद्धीचा लाभ घेण्याची संधी आहे. परंतु, राष्ट्रवादीला उदयनराजे यांचा विसर पडल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यासह ४० जणांचा समावेश आहे.
कॉलर उडविण्याची स्टाईल महाराष्ट्रात प्रसिद्ध
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या बिनधास्त स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओला प्रचंड व्हिवर्स असतात. फेसबुकवर देखील त्यांचे लाखो फॉलोवर्स आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. विेशेष म्हणजे उदयनराजे यांची कॉलर उडविण्याची स्टाईल सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर छत्रपती उदयनराजे यांनी दौरे केल्यास त्याचा राष्ट्रवादीला फायदाच होईल, असं अनेकांचे मत आहे.