औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना लोकसभेसाठी मावळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पहिल्याच जाहीर सभेतील भाषणामुळे पार्थ पवार सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहे. परंतु, ट्रोल झालेल्या पार्थ पवारांच्या पाठिशी राजकीय वारसदार असलेले नेते धावून आले आहेत.
पार्थ पवार पहिले भाषण करताना भांबावलेले दिसून आले. भाषणानंतर पार्थ यांच्या उमेदवारीवरच सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र पार्थ यांच्या ट्रोल होण्याचे वृत्त आल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे. ट्विट करून त्यांनी 'पार्थ लंबी रेस का घोडा' असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या भाषणाची खिल्ली उडविण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे नितेश यांनी म्हटले आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पार्थ यांची पाठराखण केली आहे. भाषण करता आले नाही, म्हणजे पार्थ समाजासाठी काही काम करू शकणार नाही, असं होत नाही. पार्थ यांच्या भाषणाच्या वेळी अजित पवार उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे कदाचित तसे झाले असेल. १९९५ मध्ये मी भाषण केले, त्यावेळी मी पार्थ यांच्यापेक्षा वाईट भाषण केले होते, असंही धनंजय मुडे यांनी म्हटले.