मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक मतदार संघातील उमेदवारांची घोषणा झाली आहे. यामध्ये मराठावाड्यातील नांदेड वगळता सर्व मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. परंतु, मराठवाड्यातील आठपैकी सात मतदार संघांपैकी एका मतदार संघात महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी 'नारीशक्ती'ची कमतरता भासणार आहे. भारतीय जनता पक्षाने बीड मतदार संघातून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची अट नाही. तरी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, मराठवाड्यात केवळ एका ठिकाणी महिलेला प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रितम मुंडे या बीडमधून विद्यमान खासदार आहे. पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला आलेल्या सहापैकी चार जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये नंदूरबारमधून विद्यमान खासदार हिना गावित आणि रावेर मतदार संघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगावमधून स्मिता वाघ यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला असून दिंडोरी मतदार संघातून भाजपने भारती पवार यांनी उमेदवारी दिली आहे. भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या तुलनेत मराठवाड्यातील आठ मतदार संघांपैकी केवळ एका मतदार संघात महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाड्यात भाजपकडून केवळ बीड मतदार संघातून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उर्वरित मतदार संघात सर्वच पक्षांनी नारीशक्तीवर विश्वास दाखवला नसून नांदेडचा उमेदवार अद्याप घोषीत झालेला नाही.