मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनामुळे राजकीय पुढाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. योजना रखलड्यामुळे येथील ११ गावातील गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गावकऱ्यांच्या आक्रमक भूमीकेमुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण तालुक्यातील ११ गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात तहसीलदारांना निवदेन देखील देण्यात आले आहे. त्यानंतर मतदानावरील बहिष्कार गावकऱ्यांनी मागे घ्यावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले. मात्र गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहे. निवडणुका जवळ येताच ही योजना पूर्ण केली जाईल असे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागल्याने २३ वर्षांपासून काम रखडलेले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच धास्तावले आहे.
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या गावातील नागरिकांची शुक्रवारी तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेत सर्वांनी मतदान करण्याची विनंती केली. परंतु, गावकऱ्यांनी प्रशासनाची विनंती धुडकावली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा रावसाहेब दानवे हे खासदार राहिले आहेत. यावेळी मात्र गावकऱ्यांच्या मतदानावरील बहिष्काराच्या भुमिकेमुळे त्यांची चिंता वाढली आहे. मतदानावरील बहिष्कार कसा मागे घेता येईल यासाठी रावसाहेब दानवे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावकरी जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दानवेंच्या अडचणी वाढू शकतात.
मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या ११ गावातील गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे. त्यातील काही गावकऱ्यांनी मतदान करण्याचे आश्वासन दिले आहे. उरलेल्या गावकऱ्यांचे ही मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. मतदान सर्वांनी करून आपला हक्क बजावला पाहिजे.- महेश सावंत ( तहसीलदार पैठण )