आता मोदींच्या निशाण्यावर शरद पवारांचा कौटुंबिक कलह!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:43 PM2019-04-01T15:43:15+5:302019-04-01T15:45:44+5:30
नरेंद्र मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते.
विश्लेषण :राजा माने
वर्ध्यातील दुपारी बाराचे ४१चा पारा गाठायला आसुसलेले ऊन! आशा रणरणत्या उन्हात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी मैदानावर चौफेर तोफा डागल्या. पण मुख्य टारगेट ठरले शरद पवार!
आक्रमक बाणा आणि महाराष्ट्राच्याही राजकारणात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इरादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील शुभारंभाच्या सभेत स्पष्ट झाला. २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ मोदी यांनी याच भूमीत केला होता. सेवग्राम आणि महात्मा गांधी-विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या वर्ध्याच्या भूमितूनच त्यांनी त्यावेळी आपल्या पंतप्रधान पदाची दावेदारी त्या सभेत स्पष्ट केली होती. २०१९ च्या आपल्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करताना त्यांनी थेट शरद पवार परिवारावरच सर्जिकल स्ट्राईक केला. मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते. त्यांनी ते तर केलेच शिवाय देशाला अंतराळ क्षेत्रात अभिमान वाटावा अशा कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करून या पुढच्या चाचण्या जनतेला पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्याची घोषणाही केली.
महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आणि देशाच्या राजकारणात शरद पवारांचा असलेला बोलबाला लक्षात घेऊन त्यांनी पवार परिवारावरच हल्ला चढविला. माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा आणि नंतर घेतलेली माघार या मागच्या पवार कुटुंबातील कथाकथित संघर्षाची झालेली जोरदार चर्चा याचा नेमका उपयोग मोदींनी पवारांवर निशाना साधताना आज केला. त्यांच आक्रमण महाराष्ट्रातील काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि शरद पवार कुटुंबावरच बेतलेले दिसते. राष्ट्रवादीची पक्ष संघटना आणि कौटुंबिक ऐक्यावर शरद पवारांचा प्रभाव उरला नसल्याचा संदेश देत होते. तो देताना पवारांचे वजन पूर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगताना त्यांच्यावर पुतण्यानेच मात केल्याचा धागा त्यांनी पकडला. पवारांची माढ्यातली उमेदवारी आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांची मावळ उमेदवारी यावरून झालेल्या राजकाराणाचा उल्लेख करून मोदी थांबले नाहीत. अजित पवारांचे शेतीच्या पाणीवरून गाजलेले वादग्रस्त विधान आणि मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार याचीही आठवण त्यांनी करून दिली. कौटुंबिक पातळीवर पोहचून एखाद्या राज्यातील नेत्यावर असा हल्ला मोदींनी कदाचित पहिल्यांदाच केला असेल. वर्ध्यातील त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्दांना आक्रमकतेची झालर होतीच. परंतु, त्याला राज्यातील पवारांसारख्या प्रमुख नेत्यांनाच टार्गेट करण्याची नवीन स्ट्रॅटर्जी मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आखल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले शरद पवार सध्या काँग्रेसच्या समन्वयाकाची भूमिका साकारत असल्याचे वृत्त नेहमीच येते. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला लक्ष्य करण्यापेक्षा शरद पवारांना लक्ष्य केल्यास आपला हेतू साध्य होऊ शकतो, हे मोदींनी हेरल्याचे दिसते. त्यातच पवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून घेतलेली माघार भाजपच्या भितीपोटीच असल्याचे भासविण्यात, मोदींनी यश आले. तसेच २०१४ च्या निवडणुकीतही अजित पवार यांचे धरणाच्या पाण्यावरील वादग्रस्त वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यावेळी देखील भाजपकडून त्या वक्तव्याचा शस्त्राप्रमाणे वापर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मोदींनी अजित पवारांच्या त्या वक्तव्याला जोडून शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा समोर केला आहे. या मुद्दावर राज्यातील भाजप पुन्हा एकदा पवारांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.