मुंबई - लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची डोकेदुखी ठरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभेत काँग्रेसला चर्चा करायची असल्यास ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण 'काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.' असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत पोस्ट शेयर केली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने युती झाली नाही. परिणामी, प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि इतर नेत्यांना सोबत घेत वंचित बहुजन आघाडीचे ४८ उमेदवार उभे करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीत अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने लाखांच्यावर मतं घेतली. त्यामुळे, कॉंग्रेसच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी पराभव झाला. आता, विधानसभेत कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल असं प्रकाश आंबेडकर म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं मिळाली आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे निवडून आले आहे. आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच राज्यात कॉंग्रेसला अपयश आले असल्याचे काँग्रेसनंही मान्य केला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेससोबत जाणार का औत्सुक्याचे ठरेल.