रेव्ह पार्टी चारित्र्य असलेल्यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांची पार्थवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 09:07 PM2019-04-22T21:07:36+5:302019-04-22T21:13:34+5:30
उद्याचं राजकारण आणि सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार का असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवार यांच्यावर केली आहे.
मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरलं आहे. निवडणुकीचं चॉकलेट कोणाला दिलं? रेव्ह पार्टीचं चारित्र्य असणाऱ्यांना दिलं. उद्याचं राजकारण आणि सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार का असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवार यांच्यावर केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतली या सभेमध्ये आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात चॉकलेट पर्व सुरू आहे. निवडणुकीचं चॉकलेट कोणाला दिलं त्याचं चारित्र्य काय? निवडणुका काय नातवाचे लाड पुरविण्यासाठी आहेत का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र मुठीत असल्यासारखं वागतायेत. थट्टा मस्करी करण्यासाठी निवडणुका लढता का? असा टोला आंबेडकरांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या सभेतही प्रकाश आंबेडकर यांनी पवार कुटुंबीयांना टार्गेट करत सांगितले होते की, समाजातील अनेकांना डावलून कुटुंबशाहीचे राजकारण सुरु आहे. ही कुटुंबशाही संपल्याशिवाय डावलले गेलेल्या वंचित समाजासाठी दारे उघडणार नाहीत. त्यामुळे समाजातील युवकांनी वेळीच सावध व्हायला हवे, सुप्रिया सुळे म्हणतात, लोकसभा निवडणुकीत माझे आठ नातेवाईक उभे आहेत. ह्या कुटुंबशाहीच्या विरोधात आमची लढाई आहे. अहमदनगरमध्ये अनेक जण इच्छुक असतानाही विद्यमान आमदारांनी तिकीट देऊन मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप राष्ट्रवादीवर आंबेडकरांनी लावला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याची टीका केली होती.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची केली आहे.