Lok Sabha Election 2019: प्रियंका गांधींचे महाराष्ट्रावरही लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:14 AM2019-03-28T11:14:51+5:302019-03-28T11:16:53+5:30
प्रियंका यांच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सभांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुंबई - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी छत्तीसगड आणि महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांचे नाव आहे. तसेच काँग्रेस उमेदवारांकडून प्रियंका गांधी यांच्या सभेची मागणी होत आहे. प्रियंका यांच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सभांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रियंका यांच्या महाराष्ट्रातील प्रचारांच्या तारखा अद्याप ठरल्या नसून त्यावर काम सुरू असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मुंबईत प्रियंका यांची एक सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदार संघांमध्ये निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघांमध्ये १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधीया, मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, मुकूल वासनिक, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे.
दरम्यान प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रातील सभांमुळे येथील काँग्रेसला उभारी मिळणार आहे. प्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यांचा तेथील आक्रमक प्रचार भाजपसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यांच्या प्रचाराच्या पद्धतीमुळे प्रियंका यांच्या सभांची मागणी देशभरात वाढल्याचे सांगितले जात आहे.