मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पुढारी आणि पक्षातील नेते सध्या गावोगावी भेटी देत आहेत. तसेच पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे प्रत्यक्ष भेटींना प्राधन्य देण्याचे ठरवले आहे. परंतु, आता प्रत्यक्ष भेटीत देखील भाजप नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार होताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचार करणे भाजप नेत्यांना अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.
बीड मतदार संघात अशा घटना पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रितम मुंडे यांच्या प्रचारादरम्यान अशा घटना घडत आहेत. उमेदवार किंवा नेतेमंडळी प्रचाराला गेले असताना मतदारांकडून विकासकामांविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत. तसेच खासदार निधी खर्च का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भाजप आमदार संगिता ठोंबरे नुकत्याच बीड जिल्ह्यात प्रितम मुंडे याचा प्रचार करत असताना त्यांना देखील असाच अनुभव आला आहे. ग्रामीण भागात प्रचाराला गेल्या असताना तेथील गावकऱ्यांनी आमच्या गावाला का निधी दिला नाही, असा सवाल केला. आम्ही देवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही भाजपला मतदान केले, मात्र गावाला निधी का दिला नाही, असंही विचारण्यात आले. त्यामुळे आमदार ठोंबरे यांची चांगलीच अडचण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२०१४ मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने विजय मिळवला होता. परंतु, हे दुधारी शस्त्र भाजपवर उलटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून नेत्यांना प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य देण्याच्या सूचना मिळाल्याचे समजते. परंतु, आता प्रत्यक्ष भेटी देखील भाजपनेत्यांसाठी अडचणीच्या ठरत आहेत.