मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पक्षांतरचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. भाजपने अनेक उमेदवार आयात केले असताना, काँग्रस-राष्ट्रवादीने देखील तोच कित्ता गिरवला. यामध्ये नगरच्या विखे कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वातावरण ढवळून काढले. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे यांना लगेच नगरची उमेदवारीही मिळाली. मुलाला भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील सुजयच्या राजकीय भवितव्यासाठी आपली ताकद पणाला लावत आहे. त्यामुळे राधाकृष्ण यांना काँग्रेसपेक्षा सुजय विखेंचीच अधिक चिंता वाटत असल्याचे नगरमध्ये चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांना पक्षांतराचा मोठा फटका बसला. काही ठिकाणची बंडखोरी रोखण्यात पक्ष नेतृत्वांना यशही आले. परंतु, नगरच्या जागेचा पेच काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडवता न आल्याने माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर भाजपने सुजय यांना लगेच उमेदवारी देखील दिली. आता सुजयसाठी राधाकृष्ण यांच्याकडून सुरू असलेली फिल्डींग म्हणजे युतीधर्माचा भंगच असल्याचे बोलले जात आहे.
याआधी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोतकर यांची समजूत काढली. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आपण युतीधर्म पाळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. परंतु, काँग्रेसमध्ये युतीधर्माविषयी काहीही घेणं-देणं पाहायला चित्र आहे.
भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर खुद्द विखे-पाटील यांनी मुलासाठी त्यांची भेट घेतली. गांधी यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटलांना यशही आले. असं असताना पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या विखे पाटील यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपद काढल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत सामील करण्यात आले आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विखे पाटील युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याउलट मुलाच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या विरोधात जावून भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटील व्यस्त आहेत. यामुळे भाजप-सेनेचे नाराज नेते युतीधर्म पाळत असताना विखे पाटलांना मात्र पुत्रप्रेम आवरणे कठिण जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.