मुंबई - लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून सैन्याच्या बलिदानाचा वापर करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या नावावर जाहिर सभांमधून मत मागत आहेत. हे अत्यंत चुकीचे वाटते. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिरेकी हल्ल्यात आजी आणि वडिलांना गमावले तरी देखील त्यांच्या नावे कधी मतं मागितली नाही, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते, असं अभिनेत्री आणि काँग्रेसची लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे.
देशाच्या सैन्याला मोदींची सेना म्हणून संबोधले जाते. मत मागण्यासाठी तुम्हाला सैन्याची गरज का पडते, असा सवाल उर्मिला मातोंडकर हिने उपस्थित केला. त्याचवेळी काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे आणि काँग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला बोलत होती.
मागील पाच वर्षांत राहुल गांधी यांना सतत टार्गेट करण्यात आले आहे. प्रत्येक पातळीवर राहुल यांना हिणवण्यात आले आहे. राहुल यांनी अतिरेकी हल्ल्यात स्वत:च्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांना गमावले. वडिलांचा देह ज्या व्यक्तीला पाहता आला नसल्याचे उर्मिलाने सांगितले. मात्र तरी देखील मागील पाच वर्षांपासून ती व्यक्त जनमाणसात जात आहे. त्यांच्या अडचणी समजूत घेत आहे. विशेष म्हणजे आजी आणि वडिलांच्या बलिदानाचे राजकारण करताना दिसत नाही, असं सांगताना मोदी आणि भाजपकडून सैन्याच्या पराक्रमाचे करण्यात येत असलेले भांडवल यावर उर्मिलाने कडाडून टीका केली.
पाच वर्षांपूर्वी खोटे आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली. मात्र जनतेने दिलेल्या बहुमताचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. भारतीय सेनेला निवडणुकीच्या प्रचारात मोदींची सेना म्हणणे चुकीचे आहे. सैन्याच्या शौर्यावर मत मागण्यामुळे प्रचंड तिडीक येत असल्याचे उर्मिलाने म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथे झालेल्या जाहिर सभेत उपस्थितांना सैन्याच्या शौर्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन केले होते. तसेच भाजपला मत देऊन शहिद जवानांना श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले होते. त्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली. त्यावर उर्मिलाने देखील जोरदार हल्ला चढवला.