मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण भारतातील वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यानंतर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासाठी राहुल गुरुवारी प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यात राहुल गांधी तीन प्रचार सभा घेणार असून पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.
वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नागपुरात सभा घेणार आहे. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. ५ एप्रिल रोजी राहुल पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा येथे दोन सभांना राहुल गांधी संबोधित करणार आहेत.
नागपूरमधून काँग्रेसनेचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी राहुल यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्ध्यातील सभेचे नियोजन आहे. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता राहुल खुद्द वर्ध्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे वर्ध्यातील लढत चुरशीची मानली जात आहे.
राहुल गांधी यांच्या नागपुरातील सभेचे आयोजन ५ एप्रिल रोजी कऱण्यात आले होते. परंतु, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या सभेमुळे राहुल यांच्या सभेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.
दरम्यान दुसऱ्या टप्प्यात लातूरमधील औसा आणि औरंगाबाद येथे राहुल गांधी यांच्या सभेच्या आयोजनासाठी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.