मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणूक बटाटे वड्याने गाजली होती. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अखेरच्या काळात उद्धव यांच्याकडून केवळ बटाटे वडे खायला दिले होते, असा दावा केला होता. त्यामुळे ती निवडणूक बटाटे वड्यांनी चांगलीच गाजली होती. २०१९ ची निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या खोट्या दाव्यांमुळे गाजत आहे. यावेळी देखील राज ठाकरेच केंद्रस्थानी असून राज सध्या पुराव्यानिशी मोदींवर हल्ला चढवत आहे.
राज ठाकरे यांची मोदीविरुद्धची भाषणे गर्दीचे नवनवे विक्रम करत असताना सोशल मीडियावर देखील राज यांचाच बोलबाला आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे यांचे प्रचंड फॉलोवर्स असून त्यांच्या सभा जेव्हा लाईव्ह असतात, त्यावेळी हजारो लोक त्या फेसबूकवरून पाहात असतात. राज यांनी फेसबूक लाईव्हच्या व्हिव्हर्समध्ये मोदींना मागे टाकल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. जेवढे व्हिवर्स राज यांच्या व्हिडिओला एका तासात मिळतात, तो आकडा पंतप्रधान मोदींच्या लाईव्ह व्हिडिओला नऊ तासात देखील गाठता आला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
राज ठाकरे यांच्या सातारा येथील जाहीर सभेचे मनसे अधिकृत फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या लाईव्ह सभेला केवळ एका तासांत ८६ हजार व्हिवर्स होते. यामध्ये १३०३ शेअर, ३२०० कमेंट आणि ४५०० लाईक होते. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील सभा लाईव्ह करण्यात आली होती. त्या सभेला ९ तासांत ५२ हजार व्हिवर्स मिळाले होते. तर ३२० शेअर, दोन हजार कमेंट आणि ३४०० लाईक होते. यावरून राज ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हमधून मोदींना मात दिल्याचं मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. याचा देखील पुरवा मनसेकडून देण्यात येत असून त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.
दरम्यान व्हिवर्स आणि रिएलीटी यात मोठा फरक आहे. अनेकांच्या मते राज यांच्या सभांच्या गर्दीचे रुपांतर मतांत होत नाही. परंतु, राज यावेळी स्वत: मैदानात उतरले नसून सत्ताधाऱ्यांना त्यांच्या सभांचा दणका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.