रवींद्र देशमुख
तब्बल १० वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बाजुला सारून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात उतरवले. त्यावेळी गुजरात विकासाचे मॉडेल तळागाळात पोहचविण्यासाठी योग्य ती खबरदारीही घेण्यात आली. केवळ 'गोध्रा'मुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या मोदींची प्रतिमा शेवटच्या घटकापर्यंत विकासपुरुष म्हणून उदयास आणण्यासाठी संघ-भाजपने सोशल मीडियाचा यथासांग वापर केला. यासाठी अनेक नेत्यांचा आणि तत्कालीन विरोधकांचा हातभारच लागला. अर्थातच गुजरात विकासाचे मॉडेल गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत जगजाहीर झाला. परंतु, त्यासाठी बराच काळ जावा लागला हेही तेवढच खरं.
महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीच २०१४ मधील पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी यांची मराठी माणसाला चांगल्या प्रकारे ओळख करून दिली होती. आपल्या झंझावाती भाषणांमुळे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय मीडियामध्ये राज ठाकरे यांच अढळ स्थान होतं. त्यांच हे स्थान आजही अबाधित आहे, यात शंका नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे यांनी गुजरातला भेट देऊन तेथील विकासाचे कौतुक केले होते. त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या विकासाचे कौतुक करणे हे आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला भावले. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या 'मनसे'ने देखील लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच शिवसेनेविरुद्ध उमेदवार देण्याचे निश्चित केले. परंतु, याचवेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. त्या निवडणुकीत मनसेच्या वाट्याला अपयश आले, किंबहुना अनेक ठिकाणी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की मनसेवर ओढावली. तर महाराष्ट्रात कधी नव्हे असा भाजपचा विजय झाला.
दरम्यान सत्तेत आलेल्या मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटी यासारखे मोठमोठे निर्णय घेतले. परंतु, फसलेली नोटबंदी आणि वाढती बेरोजगारी यामुळे मोदी सरकारवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातच मोदींच्या समर्थनात सर्वप्रथम पुढे आलेल्या राज ठाकरे यांनी आपली मोदी विरोधी भूमिका स्पष्ट केली. तसेच सरकारच्या कारभारावर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पदार्पण करून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच भाजप देशासाठी घातक असल्याचे सर्वप्रथम त्यांनी म्हटले.
राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नसून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मोदींना विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले. अर्थात मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यात काहीही वावगे नाही. मात्र मोदी सरकारविरुद्ध राज ठाकरे यांचा आक्रमक पावित्रा अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यातच आता राज ठाकरे महाआघाडीच्या व्यासपीठावर जाणार असल्याचे समजते. त्यामुळे २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे हे मोदी सरकार उलथवण्यास मदत करून प्रायश्चित तर करत ना नाही, असा प्रश्न मनसे सैनिकांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.