मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून राज यांच्यावर निशाणा साधला. राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत आठवलेंनी आपल्या भाषणातून राज यांच्यावर टीका केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले आहेत. त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली. सभेला गर्दी करण्याच्या नियोजन राज ठाकरेंकडे आहे पण उमेदवार कसे निवडून आणायचे हे नियोजन आमच्याकडे आहे असा टोला आठवलेंनी लागवला.
रामदास आठवले पुढे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरातिची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीका करत आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा टीका करायचे पण अशा टीका त्यांनी कधी केली नाही अशी आठवण आठवलेंनी करून दिली.
राष्ट्रवादी - काँग्रेस सोबत गेले आहेत राज
म्हणुनच इथे आलो आहे मी आज
कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज...
नेहमी वेगळ्या पद्धतीने कविता करत भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत राज आणि आघाडीवर अश्याप्रकारे टीका केली. आपल्या भाषणात आठवलेंनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान यांची स्तुती सुद्धा केली.