औरंगाबाद - ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर हँडलचे नाव बदलले आहे. त्यांनी चौकीदार नरेंद्र मोदी असे नाव धारण केले आहे. त्यावर विरोधाकांकडून टीका होत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून मोदींच्या चौकीदार या कन्सेप्टवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करताना चौकीदारची खिल्ली उडवली. तसेच गणिताच्या पुस्तकाला इतिहासाच कव्हर लावलं म्हणून गणित सुटणार नाही, त्यासाठी गणिताचाच अभ्यास करायला हवा. विषयांतर करू नका, जे समोर आहे त्याची उत्तर द्या, असे आवाहन रोहित पवार यांनी मोदींना केले आहे.
मी शेतकरी आणि माझा हमीभाव?
मी नोकरदार आणि माझी महागाई?
मी विद्यार्थी आणि माझी स्कॉलरशीप?
मी बेरोजगार आणि माझी नोकरी?
मी गृहणी आणि माझे हक्क?
मी उद्योजक आणि माझे आर्थिक धोरण?
मी व्यापारी आणि माझे वाढवलेल टॅक्स?
मी सामान्य भारतीय नागरिक आणि माझा स्वाभिमान?
मी पालक आणि माझ्या मुलांचे भवितव्य?
तुम्ही जे आहात त्या भूमिकेतून प्रश्न विचारा?
उत्तर देता आलं नाही की हे चौकीदाराच्या भूमिकेत जातील. तेव्हा चौकीदारच प्रश्न विचारतील की, नोटबंदीत नोटा बुडवल्या, GST व्यवसाय बुडवले. आत्ता चौकीदारी करायची तर कशाची.
रोहित पवार यांनी ही पोस्ट करताना नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटचा फोटो देखील शेअर केला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली आहे.