Lok Sabha Election 2019 : भाजपकडून संजय काकडेंची नाराजी दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:13 PM2019-03-22T14:13:19+5:302019-03-22T14:16:02+5:30
पुण्याच्या जागेवरून संजय काकडे उत्सुक आहेत. मात्र पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यातच अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार गुलदस्त्यातच आहे.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील लोकसभेचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेकाँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा होत्या. परंतु काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचे समजते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच संजय काकडे हे भाजपमध्येच राहणार असल्याचे म्हटले. तसेच त्यांचे स्थानिक प्रश्न सोडविण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे काकडे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे उत्सुक आहेत. याआधीच त्यांनी आपण पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. मात्र काकडे यांना भाजपकडून पुण्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर होती. त्यामुळे काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पवार यांच्यासह काँग्रेस नेते प्रविण छेडा यांनी देखील भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यावेळी व्यासपीठावर संजय काकडे देखील उपस्थित होते.
पुण्याचा भाजप उमेदवार गुलदस्त्यातच
पुण्याच्या जागेवरून संजय काकडे उत्सुक आहेत. मात्र पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यातच अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीवर देखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुण्यात भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित होते आहे. परंतु, आता संजय काकडे भाजपमध्येच राहणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे काँग्रेसचा देखील पुण्याचा उमेदवार अद्याप निश्चित नाही.