मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या माढा मतदार संघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यात आता प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यातच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना गद्दार म्हटले. त्याला संजय शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, संजय शिंदे यांनी गद्दारी केली आहे. त्यांना याची किंमत मोजावी लागेल. त्यावर संजय शिंदे यांचे प्रत्युत्तर आले आहे. आपण भाजपमध्ये कधी प्रवेशच केला नाही. त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच नाही. आपण कुणाच्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे संजय शिंदे यांनी म्हटले. अपक्ष जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. मात्र रणजीतसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपमध्ये सामील होणारे नेते कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अडकलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेलो नसून त्यामुळे मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, अशी सनसनीत चपराक शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावली आहे.
दरम्यान संजय शिंदे यांना भाजपकडून लोकसभा लढविण्यासाठी विचारण्यात आले होते. परंतु त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नकार दिला होता. मात्र माढा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली असताना शिंदे यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे.