- राजा माने
मुंबई - "आमलं ठरलंय" ही टॅग लाईन व सतेज पाटील यांचे ऍक्शन फोटो असलेल्या पोस्टने समाज माध्यमात मोठा धमाका केला आहे. मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत असलेल्या या पोस्ट्समुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. त्यात एका वाहिनीच्या सर्वेक्षणात कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे दाखविल्याने "आपलं ठरलंय..." ही बंटीची पोस्ट मुन्ना समर्थकांना अधिकच घायाळ करताना दिसतेय.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपली प्रत्येक जागा सुरक्षित करण्यासाठी जोरदार पायपीट करीत असताना कोल्हापूर आणि मावळ संदर्भात उठलेल्या चर्चेच्या नव्या वादळांमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. या पोस्टमध्ये “आता वेळ निघून गेलीये...घात करणाऱ्यांवर आसूड ओढणारच”, असा निर्धारही व्यक्त होतो. बंटी व मुन्ना या 'लाडा'च्या व 'प्रेमा'च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोहोंमधील संघर्ष उभ्या महाराष्ट्राला नवा नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुन्ना यांना संसदेत धाडण्यात बंटी यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मुन्ना यांनीच बंटी यांना झटका दिला. तिथून पुढे झालेल्या प्रत्येक राजकीय रणांगणात या दोघांनी नेहमीच जोरदार शड्डू ठोकले. हा इतिहास कोल्हापूरकरांना व उभ्या महाराष्ट्रालाही माहित आहे. या पार्श्वभूमीवर ''आपलं ठरलंय'' ही पोस्ट समाज माध्यम जगतात धमाका करतेय.
दक्षिण महाराष्ट्राच्या व साखर पट्ट्याच्या राजकारणात शरद पवार यांचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर देखील त्यांचे प्रभुत्व रहायचे पण, २००९ साली त्यांचेच विश्वासू शिलेदार तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलीक यांनी बंड केले आणि राजघराण्याचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा त्यावेळी पराभव केला. त्या निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्या मुन्ना उर्फ धनंजय महाडीक यांना मात्र उमेदवारी दिली गेली नाही. याचीच भरपाई २०१४ साली शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन केली. त्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी इमानेइतबारे आपली शक्ती, महाडीक यांच्या बाजूने लावली होती. त्यानंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र खासदार धनंजय महाडीक यांनी सतेज पाटील यांचा भ्रमनिरास केला. असे अनेक संदर्भ ''आपल ठरलय'' या पोस्टशी जोडले जात आहे.