सातारा - माण तालुक्यात राष्ट्रवादीला सर्व सत्तास्थाने आपल्यामुळेच मिळाली. तरीही सन्मानाची वागणूक मिळाली नाही. हे असेच घडणार असेल तर पक्ष सोडलेला बरा, अशी भूमिका घेणाऱ्या शेखर गोरे यांनी आजअखेर माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु, अद्याप राष्ट्रवादी सोडली नसल्याचे गोरे यांनी सांगितले.
याआधी गोरे म्हणाले होते, तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मला विकत घ्यायचे एवढे सोपे नाही. मला घर नाही म्हणता, त्यांनी माझे सातारा आणि पुण्याचे घर पाहावे. वेळ असेल तर फार्म हाऊसही बघावे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार म्हटले होते.
काँग्रेस नेते आणि आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी भाजपचे माढामधील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र राष्ट्रवादी अजून सोडली नाही, भविष्यात निर्णय घेऊ, असंही शेखर गोरे यांनी म्हटले आहे. माढा मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यात आता शेखर गोरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होणार आहे.