हातकणंगले: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा विजयी झालेले राजू शेट्टी पराभवाच्या छायेत आहे. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील यांनी जवळपास 1 लाख मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव केला होता. धैर्यशील यांनी दहा वर्षांनंतर या पराभवचा बदला घेत शेट्टींना अस्मान दाखवलं.निवेदिता माने 1999 आणि 2004 मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळे 2009 मध्ये निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र राजू शेट्टींनी त्यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.राजू शेट्टींनी 2009 पाठोपाठ 2014 मध्येही विजय मिळवत दिल्ली गाठली. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पा आवडेंचा पावणे दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे यंदा राजू शेट्टींना यंदा हॅट्रिकची संधी होती. मात्र निवेदिता मानेंचे चिरंजीव धैर्यशील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभं केलं. सध्या त्यांच्याकडे जवळपास 1 लाख मतांची आघाडी आहे. त्यामुळे माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मुलानं घेतला आईच्या पराभवाचा बदला; राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 5:37 PM